नारायण राणेंचे भाजपात स्वागतपण शालजोडीने!

Thote Shubham

महाराष्ट्राच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आटापीटा करत असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अखेर घरोबा मिळाला. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी मनाशी जपलेले स्वप्न पूर्ण झाले आणि मंगळवारी ते भारतीय जनता पक्षात सामील झाले. राणे यांचे स्वागत करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर होते, मात्र यावेळी त्यांनी राणे पिता-पुत्रांना ज्या कानपिचक्या दिल्या त्या राणे कुटुंबियांना बिल्कुल आवडणाऱ्या नसतील.

राणे यांनी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. राणे यांचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथेच हा कार्यक्रम झाला. यावेळी राणे व फडणवीस या दोघांनीही आपापल्या भाषणात शिवसेनेचे नाव घेणे टाळले, हे लक्षणीय होते.

राणे यांचे चिरंजीव व माजी खासदार नीलेश तसेच त्यांचे अन्य अनेक समर्थकही भाजपमध्ये आले. राणे हे गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपमध्ये सामील होण्यासाठी ‘प्रतीक्षा यादी’त होते. त्यांच्या मागून आलेले अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करते झाले आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. परंतु राज्याच्या राजकारणात वजनदार म्हणून ख्याती असलेल्या राणेंना कोणीही आत घेत नव्हते.

राणे यांचे धाकले चिरंजीव आणि कणकवली मतदारसंघाचे विद्यमान आमदार नीतेश राणे भाजपच्याच तिकिटावर पुन्हा नशीब अजमावत आहेत. राणे कुटुंबियांनी मागील पाच वर्षांत अनेक पराभव पचवले आणि आता आणखी पराभव पाहावा लागू नये, यासाठी त्यांची धडपड आहे. राणे यांनी तसेही यापूर्वीच भाजपशी जुळवून घेतले होते. भाजपच्या मदतीनेच तर ते राज्यसभेचे खासदार बनले होते.

यावेळी फडणवीस यांनी राणे कुटुंबियांना जे शालजोडीतले दिले ते अत्यंत मासलेवाईक होते. राणे हे ‘आक्रमक आणि मेहनती नेते’ असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘काही दिवसांपूर्वी नीतेश राणे भाजपमध्ये सामील झाले. आज नीलेशही सामील झाले. ’’ मात्र नेत्यांनी आपला आक्रमकपणा नेहमीच दाखवायचा नसतो, काही वेळेला संयमही पाळावा लागतो, हे सांगायला ते विसरले नाहीत.

“नितेश राणे हे राणे यांच्या शाळेत होते, त्यामुळे आक्रमकता हा त्यांचा स्थायीभाव आहे,’ असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, नितेश राणे यांनी कोकणाचे, सिंधुदुर्गाचे प्रश्न विधानसभेत आक्रमकतेने मांडले. पण आता त्यांना आमच्या शाळेतला संयम शिकवायचा आहे. आवश्यक तेथे आक्रमकता आणि आवश्यक तेथे संयम अशा मार्गाने कोकणाचे प्रश्न सोडवायचे आहेत. ही निवडणूक आपण शांतपणे लढवली पाहिजे. प्रेमाने लढवली पाहिजे,” असे ते म्हणाले.

कोकणच्या राजकारणातील प्रमुख नेते म्हणून राणे यांचे नाव घेतले जाते. कोकणचे नेते, कोकणचे भाग्यविधाते असाही त्यांचा उल्लेख होतो. शिवसेनेत शाखाप्रमुख पदापासून वर चढत जात ते ते 1999 मध्ये शिवसेना-भाजप सरकारचे मुख्यमंत्री झाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केल्यानंतर त्यांना पक्षातून घालवण्यात आले. त्यानंतर त्यांनी काँग्रेसशी जवळीक साधली आणि त्या पक्षात ते गेले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्री होते. मात्र मुख्यमंत्री होण्याच्या महत्त्वाकांक्षेने त्यांना पछाडले होते. त्यामुळे ते कोणत्याही सरकारमध्ये समाधानी राहिले नाहीत.

विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदे यांसारख्या मुख्यमंत्र्यांना ते उपद्रव देत राहिले. तरीही त्यांची डाळ शिजली नाही. राणे यांच्या घसरणीला सुरूवात झाली ती 2014 मधील त्यांच्या पराभवापासून. गेल्या वेळेसची विधानसभा निवडणूक, त्यानंतर वांद्र्यातील विधानसभेची पोटनिवडणूक, तसेच 2014 आणि 2019 मधील लोकसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र नीलेश राणे यांचा पराभव झाला. त्यानंतर त्यांच्या राजकीय प्रभावाला ओहोटी लागल्याचे चित्र निर्माण झाले आणि काँग्रेसमध्ये त्यांना कोणी विचारेनासे झाले.

अखेर 2017 मध्ये ते काँग्रेसमधून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आणि भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सामील झाले. परंतु नारायण राणे व त्यांच्या दोन्ही पुत्रांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, विनायक राऊत, दीपक केसरकर, वैभव नाईक अशा नेत्यांवर सातत्याने टीका केली आहे.

खासकरून नीलेश राणे हे बेताल वक्तव्य करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. नीतेश राणे यांना भाजपमध्ये घेताना रा. स्व. संघाबाबत त्यांनी आधी केलेल्या वक्तव्यांचा म्हणूनच दाखला दिला गेला. काँग्रेसमध्ये असतानाही अनेक ज्येष्ठ नेत्यांचा त्यांनी अनादर केला. यामुळे राणे कुटुंबाची राजकीय प्रतिमा चांगली नाही. म्हणूनच मुख्यमंत्र्यांना त्यांना संयमाची शिकवण द्यावी लागली. आता त्यांनी बदलत्या काळाची पावले ओळखून स्वतःमध्ये बदल केला तरच त्यांची नौका पैलतीराला लागेल अशी परिस्थिती आहे.


Find Out More:

Related Articles: