माझ्या विरोधात पालापाचोळा नव्हे कचरा उमेदवार - आमदार सुरेश खाडे
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यातच मिरज विधानसभा मतदारसंघात भाजपा उमेदवाराकडून टीकेची पातळी घसरली आहे. भाजपाचे उमेदवार आणि आमदार सुरेश खाडे यांनी विरोधी उमेदवारांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
मी यापूर्वी सांगितलं होतं माझ्या विरोधात पालापाचोळा असणारे उमेदवार देऊ नका मात्र आता माझ्या विरोधात पालापाचोळा नव्हे तर कचरा उमेदवार दिला आहे, असं वक्तव्य आमदार सुरेश खाडे यांनी केलं आहे. सांगली जिल्ह्यातील बेळंकी या गावात प्रचार सभेत खाडे हे बोलत होते.
तर आमदार सुरेश खाडे यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर पलटवार केला आहे. सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांना सत्तेचा माज आला आहे.
म्हणूनच खाडे विरोधी उमेदवाराविषयी चुकीचे वक्तव्य करत आहेत. लोकशाहीमध्ये अहंकार फार दिवस चालत नाही, अहंकार एक दिवस रसातळाला घेऊन जात असतो, अशी टीका माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनीही आमदार सुरेश खाडे यांच्यावर टीका केली आहे. आमदार सुरेश खाडे हे विरोधी उमेदवारांना पालापाचोळा म्हणताहेत. मात्र या निवडणुकीत याच पालापाचोळ्यात खाडे जळून खाक होतील, अशी टीका मिरजेचे स्वाभिमानीचे उमेदवार बाळासाहेब होनमोरे यांनी केली.