
आता इतिहास आम्ही घडवणार -उद्धव ठाकरे
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक पत्रकार परिषद घेतली. या अगोदर त्यांनी राज्यातील धनगर, कुणबी, माळी, तेली, वंजारी, ओबीसी, भटके विमुक्त समाजाच्या नेत्यांशी आज चर्चा केली. यावेळी त्यांनी या समाजातील लोकांच्या मागण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले.
तसेच, यावेळी आयोजित पत्रकारपरिषदेत त्यांनी सर्व समाजातील लोकं शिवसेनेबरोबर असल्याचे सांगितले. तसेच आता इतिहास घडण्याचे दिवस गेले आता इतिहास आम्ही घडवणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा काल शेवटचा दिवस होता. त्यानंतर आज आगामी निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी काम करा असे त्यांनी यावेळी सर्व समाजाच्या नेत्यांना आव्हान केले.
यावेळी आरे संदर्भात मी स्वतंत्र पत्रकारपरिषद घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणूक संपल्यानंतर झाडे तोडणाऱ्यांचे काय करायचे हे ठरवणार असल्याचे ते म्हणाले.