मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत दुप्पटीने वाढ
शुक्रवारी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी या वेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात कुटुंबाकडे एकूण 10 कोटी 15 लाख 72 हजार 376 रूपये इतकी स्थावर आणि जंगम मालमत्ता असल्याचे त्यांनी दाखवले आहे.
3.78 कोटी रूपये मुख्यमंत्र्यांनी आपली स्थावर मालमत्ता नमूद केली आहे. हीच स्थावर मालमत्ता 2014 मध्ये 1.81 कोटी रूपये होती. प्रामुख्याने गेल्या 5 वर्षांत जमिनींच्या बाजारमूल्यात झालेल्या वाढीमुळे स्थावर मालमत्तेत वाढ झाली आहे. अमृता फडणवीस यांच्या स्थावर मालमत्तेचे मूल्य 2014 च्या 42.60 लाख रूपयांवरून आता 2019 मध्ये 99.3 लाख रूपये एवढी झाली आहे.
2014 मध्ये मुख्यमंत्र्यांकडे 50 हजार रूपये रोख रक्कम होती, 2019 मध्ये ती आता 17,500 रूपये एवढी आहे. 2014 मध्ये बँकेतील ठेवी 1,19,630 रूपयांच्या होत्या, त्या आता 8,29,665 रूपये एवढ्या झाल्या आहेत. हा परिणाम आमदारांच्या वेतनात झालेल्या वाढीमुळे दिसून येत असल्याचे कारण देण्यात येत आहे.
2014 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याकडे रोख रक्कम 20 हजार रूपये होती, ती आता 12,500 रूपये आहे. बँकेत ठेवी 1,00,881 रूपये एवढ्या होत्या, त्या आता 3,37,025 रूपये आहेत. 5 वर्षांत त्यांच्याही वेतनात झालेल्या वाढीचा हा परिणाम आहे. त्यांच्या 2014 मधील 1.66 कोटी रूपयांच्या शेअर्सचे मूल्य आता 2019 मध्ये 2.33 कोटी रूपये एवढे झाले आहे.
आपल्या प्रतिज्ञापत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी, त्यांच्या विरोधात 4 खाजगी तक्रारी असल्याचे नमुद केले आहे. या प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या चार खाजगी तक्रारींपैकी 3 तक्रारी या सतीश उके यांनी केल्या असून, एक तक्रार मोहनीश जबलपुरे यांची आहे. ज्या 3 खाजगी तक्रारी सतीश उके यांनी केल्या आहेत, त्यापैकी पहिले प्रकरण हे नुकतेच सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायदंडाधिकार्यांकडे ‘रेफर बॅक’ झालेले आहे.
चौथी तक्रार मोहनीश जबलपुरे यांनी पोलिसांचे खाते अॅक्सिस बँकेत उघडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पदाचा गैरवापर केल्याची तक्रार केली, ती या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहे. प्रत्यक्षात या बँकेत 2005 पासूनच पोलिसांची बँकखाती ही असल्याचा खुलासा गृहविभागाने यापूर्वीच केला होता. हे प्रकरण उच्च न्यायालयापुढे असून मुख्यमंत्र्यांना यात न्यायालयाने नोटीस बजावलेली नाही.