उद्धव ठाकरेंनी समोरासमोर बसवून आम्हा दोघांना तिकीटावर निर्णय घेण्यास सांगितलं - दिलीप माने

frame उद्धव ठाकरेंनी समोरासमोर बसवून आम्हा दोघांना तिकीटावर निर्णय घेण्यास सांगितलं - दिलीप माने

Thote Shubham

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेसाठी सोलापूरमध्ये चांगलाच राजकीय पेच तयार झाल्याचं पाहायला मिळत आहे. हा पेच सोडवण्यासाठी थेट उद्धव ठाकरेंनी शिष्टाई करण्याची वेळ आली आहे. उद्धव ठाकरेंनी सोलापूर मध्य मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय थेट दावेदारांवरच सोपवला आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले माजी आमदार दिलीप माने यांनी स्वतः याची माहिती दिली.

सध्या शिवसेनेत उमेदवारांना एबी फॉर्म देण्याचे काम सुरू आहे. मात्र, सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची हे अद्यापही निश्चित झालेले नाही. दिलीप माने या मतदारसंघातून उमेदवारीसाठी आग्रही आहेत. दुसरीकडे शिवसेनेतूनही महेश कोटे यांनी देखील या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला तिकीट द्यायचे की आयारामांना हा प्रश्न उभा राहिला आहे.

आपल्या उमेदवारीवर बोलताना दिलीप माने म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मला आणि महेश कोटे यांना समोरासमोर बसवलं. तसेच तुम्हा दोघांमध्ये कुणाला उमेदवारी द्यायची हे तुम्हीच ठरवा असंही संगितलं. हे ठरवण्यासाठी आम्हाला उद्यापर्यंतची (1 ऑक्टोबर) वेळ दिली आहे.”

आपल्या उमेदवारीबद्दल कोणतीही शाश्वती नसतानाही दिलीप मानेंनी शिवसेनेतील प्रक्रियेचा कौतुक केलं आहे. ते म्हणाले, “शिवसेनेत किमान काय चाललं हे कळतं. काँग्रेसमध्ये तर काही कळायचंही नाही.” असं असलं तरी आपण उमेदवारीबद्दल आशावादी असल्याचं दिलीप माने यांनी सांगितलं.

शिवसेनेच्या  महेश कोठे यांची सोलापूर मध्य मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरु आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने  देखील येथे जोरदार मुसंडी मारली आहे. प्रणिती शिंदे आणि महेश कोठे यांच्यात चांगलेच शत्रुत्व आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  शिवसेनेचे उमेदवार महेश कोठे यांना 33 हजारपेक्षा जास्त मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर होते. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि  यंदाच्या विधानसभेत भाजप-सेना युती होत  असल्याने भाजप-सेनेचा उमेदवारच निवडून येण्याची जास्त शक्यता आहे.


Find Out More:

Related Articles:

Unable to Load More