
मतांचे विभाजन टाळून भाजप-सेनेचा पराजय हेच आमचे उद्दीष्ट - राजु शेट्टी
मतांचे विभाजन टाळून भाजप-सेनेचा पराजय करणे हेच आमचे उद्दीष्ट असल्याचे विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी केले. एका कार्यक्रमानिमित्त ते पुण्यात आले होते.
मत विभाजन टाळण्यासाठी वंचित बहुजन विकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि अन्य मित्रपक्षांनी आघाडीत सहभागी व्हावे, असे आवाहनही शेट्टी यांनी केले. तसेच हे दोन पक्ष आघाडीत सहभागी व्हावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचेही शेट्टी म्हणाले.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने इतर पक्षांना 38 जागा सोडण्याचे जाहीर केले. मात्र, त्यांच्याकडे आमची मागणी 55 ते 60 जागांची आहे. आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांची गुरुवारी शेकापच्या कार्यालयात बैठक झाली. याला सर्व घटक पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी जागांसाठी जास्त आग्रह न धरता प्रत्येकाने कमीत कमी जागा घेऊन एक यादी तयार करावी आणि ती कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे द्यावी, म्हणजे त्यांनाही निर्णय घेणे सोपे जाईल, असा एकमताने निर्णय घेण्यात आला.
यापूर्वी राष्ट्रवादीशी आमचे हाडवैर असूनही त्यांनी कधीही आम्हाला त्रास दिला नाही किंवा पोलीसबळाचा वापर करून आंदोलने मोडीत काढली नाहीत. मात्र, केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आल्यापासून आंदोलनकर्त्यांचा आणि विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे आज राज्यात आणि देशात आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.
देशभरातील तरुणांच्या हाताचा रोजगार गेला. यावर सरकारकडून कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली जात नाही. त्यामुळे तरुणांनी दाद कोणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाल्याचेही शेट्टी म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणूक मी लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा आणि त्यासाठी लढणारा लोकप्रतिनिधी सभागृहात असावा, म्हणून आघाडीतील नेत्यांचीच मी निवडणूक लढवावी, अशी भावना आहे. निवडणूक लढण्याची अजून माझी मानसिकता झालेली नाही.
मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील हे एखाद्या कार्यकर्त्यावर अन्याय करून विधानसभा निवडणूक लढतील. अशावेळी एक पर्याय म्हणून ते ज्या ग्रामीण भागातील मतदारसंघातून निवडणूक लढतील, त्या मतदारसंघातून मीही निवडणूक लढणार आहे, असे शेट्टी यांनी जाहीर केले.