मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून अतिउत्साही भाजप नेत्यांची कानउघाडणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सकाळी भाजपमधील अति उत्साही इच्छुकांची पत्रकार परिषदेत कानउघाडणी केली. शहरभर सगळीकडे लावण्यात आलेल्या फ्लेक्स आणि होर्डिंग्जविषयी बोलताना ‘अनधिकृत फ्लेक्स आणि होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रदर्शन म्हणजे विधानसभेची उमेदवारी, असा अर्थ कुणीही घेऊ नये,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी फ्लेक्सबाजी आणि होर्डिंगबाजी करणाऱ्यांना ‘समज’ दिली.
महाजनादेशयात्रा शनिवारी पुण्यात दाखल झाली. तेव्हापासून शहरभरात ठिकठिकाणी झळकणारे फ्लेक्स, होर्डिंग्ज चर्चेचा विषय ठरले होते. कोथरूड येथे एका होर्डिंगमुळे रुग्णवाहिकेला रस्ता मिळाला नाही.
या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच विचारलेल्या प्रश्नावर स्वपक्षीयांना फटकारले.
महाजनादेशयात्रेच्या स्वागतासाठी पुणे, बारामती रस्त्यांवर वृक्षताेड करण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत झाला. हा आरोप पूर्ण फेटाळत मुख्यमंत्री म्हणाले,‘एकही वृक्ष तोडलेला नाही.
राज्यात सगळीकडे वृक्षारोपण मोहीम सुरू आहे. विकासाच्या कामासाठी जे वृक्ष तोडणे अपरिहार्य झाले आहेस त्यांचे मोठ्या प्रमाणात पुनर्रोपण सुरू आहे. ठिकठिकाणी देशी वृक्ष लावले जात आहेत. त्यांची निगराणी केली जात आहे. यात्रेदरम्यान वृक्षतोडीचा प्रकार घडल्याचे वृत्त नाही.’