देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत नव्या तीन मेट्रो मार्गांचे भूमी पूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी बोलताना उद्धव यांनी मोदींच भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी आपल्या भाषणाची सुरवातच “मोदीजी, किती गोष्टींसाठी तुमचं अभिनंदन करू” अशी केली.
ते पुढे म्हणाले की, कलम 370 रद्द झाल्याचा आम्हाला अभिमान आहे. काश्मीर हा आपला अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील. मोदी यांच्या रूपाने देशाला दिशा देणारं नेतृत्त्व मिळालं आहे. मुंबईला सुविधा देत आहात याचा आनंद आहे. राज्यात युतीचे सरकार येणार याची खात्री आहे. आम्हाला सत्तेचा हव्यास नाही. तर राज्याचा विकास करण्यासाठी सत्ता हवीय,’ असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटल आहे.
तर यावेळी उद्धव हे आपल्या लहान भावासारखे असल्याचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला आहे. तसेच मेट्रोमुळे मुंबई आता काही मिनिटांमध्ये फिरता येणे शक्य होईल. त्यामुळे मुंबईकरांचा वेळ वाचेल. सध्या मुंबईत 11 किमीचा मेट्रो मार्ग आहे. लवकरच या मार्गाची लांबी 325 किमीवर जाईल. गेल्या 5 वर्षात देशात मेट्रोच्या 400 किमी लांबीच्या मार्गिकांचं काम झालं. देशातील एकूण मेट्रो मार्गिकांपैकी निम्म्या मार्गिकांचं काम गेल्या 5 वर्षांत झालं आहे, असं मोदींनी आपल्या भाषणात म्हटले आहे.
तसेच सध्या लोकलमधून जितके प्रवासी प्रवास करत आहेत, तितकेच प्रवाशी मेट्रोतून देखील प्रवास करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यावर सरकारचा भर असून तब्बल 100 लाख कोटी रुपये पायाभूत सुविधांवर खर्च करण्यात येणार आहेत. लवकरच एक देश-एक तिकीट योजना देशात सुरू होईल, असं मोदींनी यावेळी स्पष्ट केलं आहे.