राजकीय अन्यायामुळेच कॉंग्रेसमधून बाहेर

Thote Shubham

 लोकसभेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने इंदापूर तालुक्‍यातून मोठ्या मताधिक्‍यासाठी माझे सहकार्य घेतले. मात्र, विधानसभेचा दिलेला शब्द फिरवला. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून माझ्यावर सातत्याने अन्याय सुरू होता. या राजकीय अन्यायामुळेच कॉंग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असून येत्या दहा दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.

इंदापूर येथे जनसंकल्प मेळावा पार पडल्यानंतर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्ष बदलाची माहिती दिली. कॉंग्रेस पक्षाशी असलेली एकनिष्ठेची नाळ तुटली का? या प्रश्‍नाला उत्तर देताना पाटील म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील जनता माझा पक्ष आहे; त्यामुळे जनतेच्या हितासाठी मला निर्णय घेणे भाग पडत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आघाडी असल्यामुळे कॉंग्रेसमध्ये राहण्यास अर्थ नाही. राज्यातील कॉंग्रेसचा वजनदार नेता म्हणायचे आणि विधानसभेचे तिकीट जाहीर होत नाही, हा काय न्याय आहे का? त्यामुळेच तालुक्‍यातील जनता चिडली आहे. कॉंग्रेसबद्दल आता आपलेपणा वाटत नाही, असेही पाटील यांनी खुलेपणाने सांगितले.

भाजप किंवा विरोधी पक्षात जाताना आपणास दडपण आहे का? याबाबत पाटील म्हणाले की, राजकीय प्रवासात कधीही चुकीचे काम, पाऊल टाकलेले नाही. ज्या पक्षात आहे त्या पक्षात प्रामाणिकपणे काम केले आहे. ईव्हीएम याबाबत मला कोणतीही भीती नाही, कोणत्याही चौकशीचा ससेमिरा माझ्यामागे नाही, त्यामुळे पक्ष बदलाचा निर्णय अगदी मोकळ्या मनाने कोणाचेही दडपण नसताना दहा तारखेपर्यंत घेणार आहे.

लोकसभेला भाजपची “ऑफर’ होती…लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून निवडणूक लढविण्यासाठी भाजपकडून ऑफर होती. परंतु, कर्मयोगी स्व. शंकरराव पाटील यांच्या विचाराच्या चौकटीत माझी जडणघडण असल्यामुळे व सुप्रिया सुळे यांना साथ देण्याचा शब्द दिल्यामुळे उमेदवारीची ऑफर नाकारली होती, असेही माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज स्पष्ट केले.


Find Out More:

Related Articles: