सतत पडणाऱ्या पावसामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांना पूर आला होता. त्यामुळे या जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे. तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पूरग्रस्त भागातील उपवर-वधूंच्या पालकांसाठी दिलासादायक घोषणा केली आहे.
या वर्षी पूरग्रस्त भागातील ज्या मुलींची लग्ने ठरणार आहेत व ज्यांच्या पालकांना लग्नाचा खर्च अशक्य आहे, अशा लग्नांचा खर्च राज्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने उचलला जाणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून याबाबतची माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, पूरग्रस्त भागात यंदाच्या वर्षी ज्या मुलींची लग्न ठरतील व ज्यांच्या पालकांना लग्नाचा खर्च करणे शक्य होणार नाही, अशांना राज्यातील दानशूर व्यक्तींच्या मदतीने पूर्ण लग्नाचा खर्च आम्ही करणार आहोत. अशा कुटुंबांनी आमच्याशी संपर्क साधावा.
तसेच अतिवृष्टीमुळे कोल्हापूर सांगलीला आलेला महापूर हा भयंकर होता. या महापुरात नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नागरिकांना आर्थिक फटका बसलाचं आहे. त्यात कोल्हापूर – सांगली भागातील पालकांपुढे आता आपल्या मुलामुलींच्या लग्नाचा मोठा प्रश्न आहे.
या वर्षी ज्यांची लग्न ठरलेली होती किंवा ठरणार होती, ती या नैसर्गिक संकटामुळे महाकठीण वाटू लागली होती. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या या घोषणेमुळे अशा उपवर मुलींच्या पालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.