भाजपने पूर्ण दरवाजे उघडले तर राष्ट्रवादी दिसणार नाही : अमित शाह

Thote Shubham
मोठ्या प्रमाणावर भाजपमध्ये प्रवेश सुरु आहेत. आम्ही चंद्रकांत पाटलांना माझ्यासारखे लोकं व्यवस्थित प्रवेश घ्या असं सांगत आहेत. भाजपने जर प्रवेशासाठी पूर्ण दरवाजे उघडले तर शरद पवार यांची राष्ट्रवादी दिसणार नाही, अशा शब्दात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी टीका केली आहे. सोलापुरात भाजपच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे लोकशाही मूल्यांना मानत नाहीत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये फक्त घराणेशाही आहे.  सामान्य युवकांना अधिकार नाही का? यांनी राजकारणाला स्वतःचा ठेका समजला आहे, असे शाह म्हणाले. यावेळी ते म्हणाले की,  अजित पवारांनी 74 हजार कोटींचा घोटाळा केला तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी आठ हजार कोटींमध्ये 22 हजार गावात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून पाणी आणलं.
विरोधकांनी केंद्र आणि राज्यात सत्ता असताना घोटाळा केला. शहीदांसाठी केलेल्या घरात देखील घोटाळा केला.  आम्ही आजपर्यंत एक रुपयांचा घोटाळा केला नाही, असेही ते म्हणाले. विरोधक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे फक्त लॉलीपॉप दाखवत होते. मात्र आम्ही जलपूजन करत कामाला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देखील स्मारकाचे काम सुरु केले आहे असे ते म्हणाले.
शाह पुढे म्हणाले की, 370 मुळे काश्मीर देशापासून दुरावलेला होतं. मात्र मोदीजींनी ते आपल्यात आणलं. काश्मीर  कायमस्वरूपासाठी भारताचं झालं. 370 रद्द करून पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले. पंतप्रधान मोदी यांच्याशिवाय कोणत्याही पंतप्रधानामध्ये 370 रद्द करण्याची हिम्मत नाही,या असेही ते म्हणाले.
राहुल गांधी आणि शरद पवार यांना विचारतो की 370 रद्द करण्याचं तुम्ही समर्थन करता की नाही? असेही ते म्हणाले. राहुल गांधी म्हणतात काश्मीर अशांत आहे. मात्र 5 ऑगस्टनंतर एकही गोळी काश्मीरमध्ये चालली नाही. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तान करत आहे.  राहुल गांधी आणि पाकिस्तान यांचं बोलणं एकच आहे, असेही ते म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनी देखील 370 विरोधात मतदान केलं, सोलापूरच्या जनतेने त्यांना उत्तर विचारायला हवं.  आम्हाला हे लोकं सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत होते. मात्र स्वतः इम्रान खान यांनी देखील स्वीकार केलं आहे की सर्जिकल स्ट्राईक झालं आहे. मैदानात या आम्ही दोन हात करायला तयार आहोत असं सांगताना देशाच्या सुरक्षेची तडजोड केली जाणार नाही असे शाह म्हणाले.
देशाला जेव्हा गरज होती तेंव्हा आम्ही तुमच्यासोबत होतो. राहुलजी आम्हाला तुमची गरज नाही, मात्र किमान शांत तरी राहा, असेही शाह म्हणाले.
शाह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात आता निवडणूक होणार आहेत.  वसंतराव नाईक यांच्यानंतर फडणवीस पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी पाच वर्ष पूर्ण केली आहेत. प्रत्येक क्षेत्रात देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण काम केलं आहे. 15 वर्षाचा झालेला खड्डा मोठा आहे, तो भरून काढण्यासाठी पुन्हा एकदा देवेंद्र यांना साथ द्या, असे शाह म्हणाले.


Find Out More:

Related Articles: