शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊ दे – सुप्रिया सुळे
भीमाशंकर – सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ओला दुष्काळ पडला आहे तर काही ठिकाणी अद्याप समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी दूर होऊन महाराष्ट्रात सुख, शांती, समृद्धी यावी व बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र व्हावा, अशी प्रार्थना भीमाशंकर चरणी केली असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे दर्शनासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, किरण वळसे पाटील, वैशाली नागवडे, अतुल बेनके, उषा कानडे, इंदुबाई लोहकरे उपस्थित होते. खासदार सुप्रिया सुळे यांनी अभिषेक करून दर्शन घेतले.
खासदार सुळे म्हणाल्या की, मागील 38 वर्षांपासून माझी आई भीमाशंकरला येतात. पण यावर्षी त्या येऊ शकल्या नाहीत. यामध्ये खंड पडायला नको म्हणून मी आली आहे. पुढच्या वर्षी माझी आई नक्की येईल. भीमाशंकर आणि आमचे अतुट नाते आहे. भीमाशंकरचा आर्शीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहिला आहे. येथील आदिवासी लोकांचे प्रेम आमच्यावर आहे म्हणून दर्शनाची परंपरा पुढेही सुरू ठेवणार आहे.