पीक विमा योजनेतील झारीच्या शुक्राचार्यांना शोधायला हवे : उद्धव ठाकरे

Thote Shubham

मुंबई - शेतकरी पीक विमा योजनेच्या झारीतील शुक्राचार्यांना शोधले पाहिजे. पीक विमा कंपन्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन सुरू केल्यानंतर १० लाख शेतकऱ्यांना ९६० कोटी रुपयांची भरपाई मिळाली, परंतु ९० लाख शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. जे शेतकरी अपात्र ठरवले त्यांना कोणत्या निकषावर अपात्र ठरवले गेले याचा शोध आम्ही घेणार आहोत. आम्ही पीक विमा कंपनी बचाव योजना चालवत नाही.

जी योजना आहे ती शेतकऱ्यांची योजना आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पीक विम्याच्या शिवसेनेच्या आंदोलनाविषयी माहिती देण्यासाठी ठाकरे यांनी शुक्रवारी मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली त्या वेळी ते बाेलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली असून यात काँग्रेसप्रणीत एनएसयूआय असल्याचे समोर आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना न मानणाऱ्यांना भरचौकात फटकावले पाहिजे. सरकार विमा कंपन्यांना पीक विम्याचे पैसे देत असते, परंतु झारीतले शुक्राचार्य हे पैसे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू देत नाहीत. ते कोण आहेत हे शोधले पाहिजे. अनेक शेतकऱ्यांना ही योजनाच माहीत नव्हती.

...तर सरकारने पैसे द्यावेतविमा कंपन्या पैसे देत नसतील तर सरकारने शेतकऱ्यांना पैसे द्यावेत. शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळालीच पाहिजे. जर शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर शिवसेना पुन्हा आंदोलन करेल, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी या वेळी दिला. या वेळी मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील नेतेमंडळी उपस्थित होते.

विम्याबाबत पंतप्रधानांना पत्रही दिलेपीक विम्याचे दोन हजार कोटी रुपये कंपन्यांकडे पडून आहेत असे सांगून उद्धव ठाकरे म्हणाले, हा शेतकऱ्यांचा पैसा आहे. कंपन्यांचा नफा वगळून इतर सर्व पैसे शेतकऱ्यांना मिळायला हवेत. कंपन्या देत नसतील तर सरकारने तो पैसा परत घेऊन अन्य यंत्रणेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायला हवा. शिवसेनेच्या सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली आहे. त्यांना एक पत्रही दिले आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी सांगितले.


Find Out More:

Related Articles: