पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी
देशाचे माजी गृहमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून 26 ऑगस्ट पर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी पी. चिदंबरम यांना चौकशीसाठी सीबीआय कोठडी सुनावली आहे. बुधवारी रात्री पी. चिदंबरम यांना सीबीआयने ताब्यात घेतले होते. सीबीआय मुख्यालयात रात्रभर चौकशी केल्यानंतर, आज त्यांना न्यायालयात हजर केलं होतं.
पी.चिदंबरम यांच्या संपूर्ण व्यवहाराची माहिती विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी त्यांना कोठडी द्यावी अशी मागणी सीबीआयने केली होती. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत चार दिवसासाठी सीबीआय कोठडी सुनावली आहे. चिदंबरम यांची जी काही चौकशी करायची आहे ती या चार दिवसात पूर्ण करावी. सोबतचं या काळात रोज अर्ध्या तासासाठी त्यांचा परिवार आणि वकील त्यांना भेटू शकतील असा आदेश न्यायालयाने दिला आहे.
दरम्यान उच्च न्यायालयाच्या धक्क्यानंतर पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने देखील धक्का दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पी. चिदंबरम हे तब्बल 27 तास भूमिगत झाले होते. मात्र काल रात्री त्यांनी कॉंग्रेसच्या मुख्यालयात येऊन पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पाळत ठेवून असलेल्या सीबीआयच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.