पंतप्रधान नरेंद्र मोदी भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा शेजारील देश भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आज सकाळीच पंतप्रधान या दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा भुतान दौरा आहे. तर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.
भुतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमध्ये शिक्षण विषयक 10 करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. तसेच मोदींच्या हस्ते इथे काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रमही पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात 17 तारखेला ताशिचोडजोंगला त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे.
याच दिवशी भुतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. तसेच भुतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांचीइदेखील मोदी भेट घेणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.