मी काश्मीरमध्ये विनाअट येण्यास तयार -राहुल गांधी
जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवरून काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यातील शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. राहुल गांधी यांनी काश्मीर दौऱ्यासाठी काही अटी टाकल्या होत्या. पण त्यांची पूर्तता करणे अशक्य असल्याचे राज्यपाल मलिक यांनी कळवले होते. त्यावर विनाअट काश्मीर खोऱ्यात येण्यास तयार आहे, कधी येऊ सांगा अशी विचारणाच आता राहुल गांधी यांनी राज्यपालांकडे केली आहे. त्यामुळे आता हा वाद राहुल गांधी जम्मू-काश्मीरमध्ये गेल्यानंतरच थांबणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
सध्या काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी अहवालांचा हवाला देऊन केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली होती. राहुल एक जबाबदार नेते आहेत. त्यांच्यासाठी विमान पाठवतो, त्यांनी काश्मीरात येऊन पाहावे आणि मग बोलावे, असे आवाहन मलिक यांनी केले होते. मलिक यांच्या आवाहनाला राहुल गांधी यांनी लगेच ट्विटरवरून प्रतिसाद दिला. विमानाची गरज नाही. विरोधीपक्ष नेत्यांच्या शिष्टमंडळासह मी काश्मीरात येईल.
पण, स्थानिक नागरिक, नेते, लष्कराचे जवान यांच्याशी मुक्तपणे बोलण्याची हमी द्या, असे राहुल म्हणाले होते. यासंदर्भात मलिक यांनी प्रशासनाकडे विचारणा केली होती. राहुल गांधी यांनी टाकलेल्या अटींची पूर्तता करणे अशक्य असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. तसे राज्यपालांनी राहुल गांधी यांना कळविले. त्यालाच राहुल गांधी यांनी पुन्हा उत्तर देत मलिक यांना सवाल केला आहे.