गिरीश महाजनांच्या सेल्फीवरून एकनाथ खडसे म्हणतात…
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुराची पाहणी केली होती. यावेळी बोटीमधून फिरत असताना महाजन यांच्या समवेत बोटीमध्ये बसलेल्या एका व्यक्तीने सेल्फीसाठी मोबाईल उंचावला, यावेळी महाजन हे हसत सेल्फी देत होते. गिरीश महाजन यांच्या सेल्फीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर महाजन यांचे कट्टर विरोधक मानले जाणारे एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खडसे यांनी ‘कोल्हापूर, सांगली, सातारच्या पुरग्रस्तांच्या मदतीसाठी महाजन यांनी अहोरात्र मेहनत घेऊन त्या ठिकाणी मदत पोहोचविली. एवढाच काय तर स्वतःही पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचविण्यात पुढाकार घेतला. मात्र महाजन यांनी केलेल्या मदती पेक्षा माध्यमांनी त्यांच्या सेल्फीला प्राधान्य देत त्यांच्यावर टीका केली अशा शब्दात महाजन यांच्या कामाचे कौतुक केले.
तसेच पुढे बोलताना खडसे यांनी ‘माध्यमांच्या या टीकेचा आपल्यालाही फटका बसला आहे. आपण केलेल्या चांगल्या कामापेक्षा दाऊदच्या बायकोशी आपले संबंध असल्याचं जास्त पसरविलं गेलं. माध्यमांनी कोणत्याही वृत्ताची खात्री करूनच ते प्रसिद्ध करावं आणि आपली विश्वासार्हता वाढवायला हवी’ असंही आवाहन माध्यमांना केले.
दरम्यान, या सेल्फी प्रकरणावरून गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी अनेक लोक माझ्यासोबत सेल्फी काढतात. मी त्यांना नकार देऊ शकत नाही. सध्या संकटाची स्थिती आहे, लोकांना प्रचंड त्रास होत आहे. मात्र, विरोधकांना फक्त या सगळ्याचे राजकारण करायचे आहे. अशा शब्दात त्यांच्यावर होत असलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते.