राज्यभरात स्वाईन फ्लूने अक्षरशः कहर माजवला आहे. 9 महिन्यांत स्वाईन फ्लूने 212 जणांचा बळी घेतला आहे, तर 18 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या एका महिन्यात स्वाईन फ्लूमुळे 15 जणांचा मृत्यू झाला आहे. बदलतं वातावरण या रुग्णसंख्या वाढीला कारणीभूत ठरतं आहे.
मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, अहमदनगरमध्ये स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून आलेत. 9 महिन्यात 2,207 स्वाईन फ्लू रुग्णांची नोंद झाली असून विविध रुग्णालयात एकूण 90 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.
राज्याच्या संसर्गजन्य विभागाद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी ते 18 सप्टेंबर दरम्यान राज्यभरात सुमारे 21 लाख 18 हजार 270 रुग्णांची तपासणी करण्यात आली. 34 हजार 611 संशयित रुग्णांना ऑसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्यात. यातील 1 हजार 906 रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे.
राज्याच्या संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, ‘‘राज्यातील बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते आहे. पण या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारद्वारे विविध स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. सरकारच्या वतीने गर्भवती महिला, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अतिजोखमीच्या रुग्णांचं मोफत लसीकरण केलं जात आहे”
“1 जानेवारी ते 15 सप्टेंबर या काळात 51 हजार 989 व्यक्तींना लसीकरण करण्यात आलं आहे. नागरिकांनीसुद्धा आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. सर्दी, ताप, घसादुखी यांसारखे आजार अंगावर न काढता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा’’, असं आवाहन डॉ. आवटे यांनी केलं आहे.