गरोदर स्त्रीसाठी लसीकरण महत्त्वाचे!
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, लसीकरणाअभावी होणारे संसर्गजन्य आजार मातामृत्यू, अर्भकमृत्यू व बालकांच्या मृत्यूंसाठी तसेच व्यंगांसाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. यासाठी स्त्रीच्या रोगप्रतिकार यंत्रणेत बदल होणे आवश्यकच असते. त्यामुळे गरोदर स्त्रीने लसीकरण घेतल्यास तिला लसीकरणाद्वारे प्रतिबंध होऊ शकणार्या संसर्गापासून थेट संरक्षण मिळते आणि गर्भाचेही संरक्षण होते.
लसीकरणामुळे आजारांपासून तुमच्या बाळाला संरक्षण मिळते. गरोदरपणात लसीकरण झालेल्या मातांद्वारे प्रादुर्भावाशी लढा देणारी प्रथिने, यांना प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) असे म्हटले जाते, त्यांच्या बाळांपर्यंत पोहोचवली जातात. त्यामुळे बाळाला या जगात आल्यानंतरचे पहिले काही महिने विशिष्ट आजारांपासून अंशत: संरक्षण मिळते. या काळात बाळ खूप लहान असल्याने त्याला थेट या लसी देणे शक्य नसते. यामुळे तुम्हाला गर्भारपणाच्या संपूर्ण काळात संरक्षण ही मिळतेच.
गरोदरपणात फ्लू शॉट किंवा धनुर्वाताची लस घेतल्यास मातेला संपूर्ण गर्भावस्थेत संरक्षण मिळते आणि तिच्या बाळालाही जन्मापासून लसीकरणापर्यंतच्या काळात संरक्षण मिळते. उदाहरणच द्यायचे तर फ्लू किंवा आचके देत येणारा खोकला अर्भकासाठी घातक असतो.
तुमचे स्वत:चे व तुमच्या बाळाचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही गर्भधारणेपूर्वी, गरोदरपणात व त्यानंतर कोणत्या लसी घेतल्या पाहिजेत हे समजून घेणे आवश्यक आहे.
गरोदरपणातल्या लसी
जेव्हा एखादी स्त्री गरोदर असते, तेव्हा 3 लसी देतात (या लसी इनअॅक्टिव्हेटेड असतात, म्हणजेच त्यात जिवंत विषाणू नसतात). यापैकी 2 धनुर्वाताला प्रतिकार करणार्या तर एक फ्लूला प्रतिकार करणारी आहे. स्त्री रोगतज्ज्ञ या लसी घेण्याचा सल्ला देतात. आता एक टीडी व एक टीडॅप देतात. (धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला प्रतिकारक लसी)
फ्लू (इन्फ्लुएंझा) शॉट : फ्लूचा प्रतिबंध करणारी लस घेणे ही आता काळाची गरज झाली आहे. कारण गरोदरपणात स्त्रीला फ्लू झाल्यास त्यातून बरीच गुंतागुंत निर्माण होऊ शकते. फ्लू झाल्यास दिवस भरण्यापूर्वी कळा सुरू होऊन लवकर बाळंतपणाचा धोका असतो. याचा परिणाम बाळाच्या आरोग्यावर होतो. याशिवाय, गर्भारावस्थेत फ्लूची लस घेतल्यास तुमचे व तुमच्या पोटातील बाळाचे फ्लूपासून संरक्षण होते आणि तुमचे बाळ जन्माला आल्यानंतरही त्याला काही महिन्यांपर्यंत फ्लूपासून संरक्षण मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे न्युमोनियासारख्या (फुप्फुसांना होणारा संसर्ग) जटील आजारांचा धोकाही कमी होतो. म्हणूनच ही लस फ्लूची साथ सुरू असताना गरोदर असलेल्या स्त्रियांनी घेणे उत्तम. फ्लू शॉटही निष्क्रिय विषाणूंपासून तयार केला जातो. त्यामुळे तो गरोदर स्त्री व तिचे बाळ या दोहोंसाठी सुरक्षित असतो.
धनुर्वातासाठी (टिटॅनस) लस : प्रत्येक गरोदरपणात या लसीचा एक डोस घेण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे नवजात अर्भकाला विचित्र खोकल्यापासून संरक्षण मिळते. मातेने टिटॅनसची लस कधी घेतली आहे, याला महत्त्व नाही. तरीही आदर्श परिस्थितीत, गरोदरपणाच्या 26-27 व्या आठवड्यात ही लस दिली जाते.
गरोदरपणात लस घेणे सुरक्षित आहे?
ज्या लसींमध्ये मृत (इनअॅक्टिव्हेटेड) विषाणू असतात, त्या गरोदर स्त्रीला दिल्या जाऊ शकतात. गरोदरपणात ज्या लसी घेण्याचा सल्ला दिला जातो, त्या घेणे उत्तम. प्रश्न फक्त फ्लूच्या लसीचा आहे आणि ती गरोदर स्त्रीला काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे. कारण, फुप्फुसांचे विकार, खोकला, सर्दी, ताप असलेल्या गरोदर स्त्रियांना ही लस दिली जाऊ नये.
या लसी टाळाव्या : हेपॅटिटिस बी हेपॅटिटिस ए गोवर एमएमआर कांजण्या नागीण (व्हरिसेला-झोस्टर) (या लसींमध्ये जिवंत विषाणूंचा समावेश असतो आणि त्यामुळे त्या आई व बाळासाठी प्राणघातक ठरू शकतात).
अनेक स्त्रिया गर्भावस्थेत लस घेणे टाळतात. कारण, यामुळे बाळाला धोका पोहोचेल असे त्यांना वाटत असते; पण या लसी अजिबात धोकादायक नाहीत आणि त्यामुळे गरोदर स्त्री तसेच तिच्या बाळाची रोगप्रतिकार यंत्रणा मजबूत होण्यात मदत होते. याशिवाय,
प्राणघातक आजारांचा सामना करणार्या बाळांना या लसींमुळे झपाट्याने बरे होण्यात मदत मिळते. म्हणूनच, तुम्ही गर्भधारणेसाठी नियोजन करत असाल तर तुम्हाला गरोदरपणात घ्याव्या लागणार्या लसींबद्दल आधीच डॉक्टरांशी चर्चा करावी लागेल.
जिवंत विषाणूंचा समावेश असलेला लसी (लाईव्ह वॅक्सिनेशन्स) या गर्भधारणेच्या किमान एक महिना आधी घेतलेल्या असाव्यात. तुम्हाला व तुमच्या बाळाला फ्लूचा संसर्ग होऊ नये म्हणून तुमच्या जोडीदाराने तसेच जवळच्या संपर्कातील व्यक्तींनीही फ्लूची लस घेतली तर उत्तम.