जगभरातील कोणत्याही खेळाडूला जमला नाही असा विक्रम हिटमॅन रोहित शर्मा च्या नावे
रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुध्द विशाखापट्टणम येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी नाबाद शतकी खेळी केली. या शतकी खेळीबरोबर, जगभरातील कोणत्याही खेळाडूला जमला नाही, असा अनोखा विक्रम रोहितने केला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा रोहित शर्मा सलामीवीर म्हणून प्रथमच मैदानात उतरला. आपला दुसरा सलामी जोडीदार मयांक अग्रवाल याच्यासह त्याने ५९.१ षटकात २०२ धावांची नाबाद सलामी दिली. यात रोहित शर्माने १२ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने नाबाद ११५ धावांची खणखणीत खेळी केली.
दरम्यान, रोहितने या खेळीनंतर एक अनोखा विक्रम केला आहे. रोहित आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धेत शतक ठोकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. आयसीसी चॅम्पियन चषक स्पर्धा, आयसीसी विश्वचषक स्पर्धा आणि आता आयसीसी कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धा या तिनही मोठ्या स्पर्धेत त्याने शतक झळकावले आहे, असा कारनामा रोहितशिवाय क्रिकेटविश्वात कोणत्याही खेळाडूला अद्याप करता आलेला नाही.