मी लपून काही करत नाही, तिथंही गेलो, इथंही मजबूत बसलो, तुमचाच कोणी ज्योतिरादित्य शिंदे होईल - अजित पवार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत चांगलीच टोलेबाजी केली. अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान उत्तर देताना अजित पवारांनी अर्थसंकल्प कसा सर्वसमावेशक आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याला विरोधी पक्ष भाजपकडून जोरदार विरोध करण्यात आला. अजित पवारांच्या भाषणादरम्यान मध्य प्रदेशातील ‘ऑपरेशन लोटस’चाही उल्लेख झाला. शिवसेनेला फसवणं ही चूक होती असा उपरोधिक टोला मुनगंटीवारांनी लगावला होता, त्यावरुन अजित पवारांनी टोलेबाजी केली.
पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात 2013-14 मध्ये मंजुर झालेल्या निधीला फडणवीसांनी सत्तेवर आल्यानंतर स्थगिती दिली होती. त्याचा उल्लेख अजित पवारांनी केला.अजित पवार म्हणाले, “कधी कधी काट्यानं काटा काढला जातो. त्यामुळं पुन्हा सत्तेत आल्यावर असं (स्थगितीचं) करु नका. चार दिवस सासूचे, चार दिवस सूनेचे असतात”.
मध्य प्रदेशातील काँग्रेस नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन, कमलनाथ सरकारला मोठा झटका दिला. शिंदे भाजपमध्ये गेल्यामुळे तिथलं सरकार डळमळीत झालं आहे. मध्य प्रदेशातील राजकीय परिस्थितीचा हा दाखला देत, भाजप आणि विरोधी पक्षातील नेते महाराष्ट्रातही तसंच होईल असा दावा करत आहेत. एक ना एक दिवस चूक होईल, कोणी ना कोणी ज्योतिरादित्य शिंदे महाराष्ट्रातही येईल, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी विधानसभेत टोलेबाजी केली.
तुम्ही कितीही म्हटले चुकी झाली, पण आम्ही मुख्यमंत्र्यांना म्हणतो चुकीला माफी नाही. इकडचा कोणी ज्योतिरादित्य शिंदे होणार नाही. तिकडचाच कोणी होईल याची काळजी घ्या.आज बरेच जण गैरहजर आहेत, त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवा, असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आकड्यांची तुलना केल्यामुळे जनतेलाही कळेल. वंचित घटकांच्या विकासासाठी आमचं सरकार प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यासंबंधी विभागांच्या निधीत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. स्थानिक आमदार निधीतही वाढ केली, त्याचं स्वागत सर्वांनी केली. डोंगरी विकासासाठी ज्या तालुक्यांना 50 लाख मिळत होते त्यांना 1 कोटी आणि ज्यांना 1 कोटी मिळत होते त्यांना 2 कोटी रुपये दिले जातील.