बाबासाहेबांचे BIT चाळीतील निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित - जितेंद्र आव्हाड
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापिरनिर्वाण दिनानिमित्ताने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (6 डिसेंबर) चैत्यभूमी (दादर) येथे अभिवादन केले. यानंतर उद्धव ठाकरेंनी परळच्या बीआयटी चाळ येथे जाऊन बाबासाहेबांनी वास्तव केलेल्या घराला भेट दिली. तसेच हे घर राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1912 ते 1934 या 22 वर्षाच्या कालावधीत परळच्या दामोदर हॉलजवळील बीआयटी चाळीत वास्तव्य केले होते. याच घरातून त्यांनी मनुस्मृती जाळण्याचा निर्णय घेतला होता. तसेच गोलमेज परिषदेलाही ते येथून गेले होते. त्यामुळे बाबासाहेबांनी वास्तव्य केलेल्या या घराला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज परळच्या बीआयटी चाळीला भेट दिली त्यावेळी त्यांच्यासोबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड तसेच मोठ्या प्रमाणात आंबेडकरी अनुयायी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांनी आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून बीआयटी चाळीत डॉ. बाबासाहेब राहिलेल्या ठिकाणी स्मारक करावी अशी मागणी केली जात होती. आजही बाबासाहेब राहिलेल्या या घरात देशातून अनेक आंबेडकरी अनुयायी भेट देण्यास येतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या परळच्या बीआयटी चाळीला जितेंद्र आव्हाड यांनीही भेट दिली. “ज्या इमारतीमध्ये बाबासाहेबांचे बालपण गेले. येथून त्यांनी मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद आणि पुणे करार यासाठीही बाबासाहेब येथून गेले होते. शाहू महाराजही याच ठिकाणी बाबासाहेबांना भेटण्यासाठी आले होते. त्यामुळे या बीआयटी चाळीचे राष्ट्रीय स्मारक झाले पाहिजे”, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.