पिचडांनी पाप केलंय, गाठ माझ्याशी आहे, सीताराम गायकरांचं धोतर फेडू : अजित पवार

Thote Shubham

 नगर जिल्ह्यातील अकोले दौऱ्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी सोडलेले माजी मंत्री मधुकर पिचड आणि त्यांचे सुपुत्र वैभव पिचड यांच्यावर हल्ला चढवला. राष्ट्रवादीने पिचडांना सर्वकाही दिलं, पण तरीही पिचडे गेले, त्यांनी मोठं पाप केलं. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या भाबळी. केसाला धक्का लावला तर अजित पवारशी गाठ आहे, असा इशारा अजित पवारांनी पिचड    पिता – पुत्रांना दिला.

“भाजपसारख्या पक्षाचा पराभव करण्यासाठी एकविचाराचे सर्व एकत्र आले आहेत. राष्ट्रवादीतून राजे गेले, सेनापती गेले, नेतेही गेले. पण शरद पवार ठामपणे काम करत आहेत. १९९५-१९९९ मध्ये  युतीचं सरकार तेव्हा पिचडांना विरोधी पक्षनेतेपद दिलं.

मंत्रिपदे दिली, जि.प. अनेक पदे अकोलेत यांनाच दिली. तरीही पिचड गेले, मोठं पाप पिचडांनी केलं आहे. एकास एक उमेदवार देण्याच्या निर्णयावर ठाम राहा. आमिषाला बळी पडू नका. कार्यकर्त्यांना दमबाजी करु नका”, असं आवाहन अजित पवार यांनी केलं.

पिचड डोळ्यात पाणी आणतील, भावनिक होतील, निवडून द्या असा नाटकीपणा करतील, पण तुम्ही बळी पडू नका, असं आवाहन अजित पवार यांनी केलं. सीताराम गायकरचं काय झालं असा जनतेतून सूर उमटला. विधानसभेला राष्ट्रवादीला निवडून द्या, त्यांचं ( सीताराम गायकर ) यांचं धोतर फेडू, असं म्हणत अजित पवारांनी पिचडांचे निकटवर्तीय तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांच्यावरही हल्ला चढवला.

आमचं सरकार आलं तर संपूर्ण कर्जमाफी देणार. दिली नाही तर पवारांची औलाद नाही. थोर पुरूषांची नावं घेऊन सत्तेवर आले. पण कोणतंही आश्वासन पूर्ण केली नाहीत. गड किल्यात आता छमछम सुरू करणार. आम्ही बंद केलेले डान्स बार यांनी सुरू केले, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.



Find Out More:

Related Articles: