सकाळी सरकारच्या नालायकपणावर बोलणारे राजे संध्याकाळी भाजपात कसे? - धनंजय मुंडे

Thote Shubham

सकाळी सरकारच्या नालायकपणाबाबत बोलणारे उदयनराजे संध्याकाळी भाजपात कसे गेले ? असा सवाल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. साताऱ्याच्या विकासाठी मी भाजपात आहे. तुमचा आशिर्वाद घ्यायला आलो आहे, असे शरद पवार यांना उदयनराजे यांनी सांगितल्याचे राजांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात येत होते या पार्श्‍वभूमीवर मुंडे यांनी चर्चेचा तपशील उघड केला.

एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना मुंडे म्हणाले, राजे भाजपात गेले यामुळे द:खी झालो आहे. शरद पवार यांच्यासोबत काल राजेंची चर्चा झाली. त्यात महाराष्ट्राच्या आणि देशातयील जनतेच्या प्रश्नांबाबत निराशा व्यक्त केली. हे सरकार जनतेच्या प्रश्‍नाविषयी संवेदनशील नाही, असे ते म्हणाले. भाजपाविषयी त्यांनी व्यक्त केलेल्या मतामुळे ते भाजपात जाणार नाहीत, याची खात्री पटली. जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्यांबाबत ते पोटतिडकीने बोलत होते.

हे सरकार जनतेच्या हिताचे नसल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र संध्याकाळी त्यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहित नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.

राजे यांच्याशी संपर्काचा मी खूप प्रयत्न केला. त्यांनी आमच्या एका मित्राकडे निरोप पाठवला की मला संपर्क साधू नका मी भाजपात जातो आहे, असे सांगून हे सरकार राजकीय दडपशाही करत आहे. मधुकर पिचड यांच्या दुसऱ्या पत्नीचे समृद्धी महामार्गामध्ये जमिनीचे प्रकरण होतं. त्याप्रकरणी कारवाई करायची की भाजपात येता? असे धमकावू त्यांना भाजपात घेतल्याचा आरोप मुंडे यांनी केला.

भास्कर जाधव राष्ट्रवादीत आल्यावर व्यवसाय नसताना ठाकरेंच्या उत्पन्नावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भास्कर जाधव यांना त्याचे उत्तर मिळाले असेल, अशी उपहासात्मक टीका करून अशी मुंडे म्हणाले पद दिलं, सगळं दिलं, तरी तुम्ही विकास केला नाहीत ही चूक की कोणाची?


Find Out More:

Related Articles: