उदयनराजे राष्ट्रवादीतच, जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
खासदार उदयनराजेंनी अद्यापपर्यंत पक्ष सोडून जाण्याची भाषा केलेली नाही. त्यामुळे ते राष्ट्रवादीमध्येच असून, त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले. आमचे निष्ठावंत नेते आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे आम्हाला सांगत असताना माध्यमेच त्यांच्यावर शंका उपस्थित करीत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, नवाब मलिक, फौजिया खान तसेच आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकी दरम्यान जयंत पाटील यांनी पत्रकाराशी संवाद साधला.
“जे नेते मंडळी आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात गेले आहेत त्या जागेवर सक्षम पर्याय शोधण्याचे काम सुरु आहे. हे नेते कोणत्या कारणाने तिकडे जात आहेत हे राज्यातील जनतेला चांगलेच माहिती आहे,” अशा शब्दांत जयंत पाटील यांनी पक्षांतर करणार्या नेत्यांवर सडकून टीका केली.
विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा असेल, असे विधान मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यावर पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मतांचे कशा प्रकारे विभाजन होईल, यावर सर्वाधिक लक्ष देण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. असे प्रकार केल्यावरच सत्तेच्या जवळ पोहोचता येते, हे त्यांना चांगलेच माहिती आहे.
त्यामुळेच त्यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत. जी नेतेमंडळी आमच्या पक्षातून सत्ताधारी पक्षात गेली आहेत. त्या जागेवर सक्षम पर्याय शोधण्याचे काम सुरू आहे. हे नेते कोणत्या कारणाने तिकडे जात आहेत, हे राज्यातील जनतेला माहीत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, या बैठकीला भुजबळ उपस्थित राहिल्याने ते सेनेत प्रवेश करणार असलेल्या चर्चांना ब्रेक मिळाला आहे.