उठसूठ ईव्हीएमला दोष देणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह विरोधकांना मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘बिघाड ईव्हीएममध्ये नाही, तर त्यांच्या डोक्यात’ असल्याचा टोला लगावला आहे. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम सोबत आपण अनेक मतदारसंघात व्हीव्हीपॅट लावले, ज्यामुळे तुम्ही कुणाला मतदान केले हे दिसत होते. अनेक मतदारसंघात आपण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मोजणी करून पडताळणी देखील केली. पण एकाही मतदारसंघात मतांची संख्या चुकली नाही. पण यांच्या डोक्यात बिघाड असल्यामुळेच जनतेने यांना घरी बसवले असा चिमटा देखील मुख्यमंत्र्यांनी काढला.
महाजनादेश यात्रा आज विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघ होती. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीवर टिका केली. आघाडी सरकारच्या पंधरा वर्षात महाराष्ट्रात झालेली कामे आणि आमच्या सरकारच्या पाच वर्षात झालेली विकासकामे यांची तुलना करतांनाच ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा जनतेची माफी मागा असा सल्ला फडणवीस यांनी विरोधकांना दिला.
गेल्या पाच वर्षात फुलंब्री विधानसभा मतदारसंघात हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली भरघोस विकास झाल्याचे प्रमाणपत्र देतांना फडणवीस म्हणाले, फुलंब्री तालुका झाल्यानंतर इथे प्रशासकीय इमारत, विश्रामगृहास सर्व शासकीच कार्यालयांच्या इमारती झाल्या, रस्ते, जलयुक्त शिवार योजना, शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मदत दिली. आताच नानांनी मला चिठ्ठी पाठवून आणखी पाच कोटी रुपयांचा निधी देण्याची मागणी केली. नाना तुम्ही आमचे अध्यक्ष आहात, तुम्ही मागाल तेवढे पैसे देऊ असा शब्द मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.